सदाशिव मोरे।
आजरा : सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विजेची बिले थकीत असणा-यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. आजरा तालुक्यातील १२२ ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केले आहे. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटची बिलेही थकीत असून त्यांचाही विद्युतपुरवठा खंडित केला जाणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून आजरा तालुक्यातील विजेची बिले कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. शेतीमालासह काजूला दरही नाही. शेतातील पिकांचे हत्ती, गव्यास जंगली प्राण्यांकडून नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे विजेची बिले भरण्यासाठी पैसे नाहीत.
मध्यंतरी शासनाकडून वीजबिल माफ करणार असल्याची चर्चा होती. मात्र तीही फोल ठरली आहे. नागरिकांकडे पैसेच नसल्याने वीजबिल भरायचे कशाने हा प्रश्न चिन्ह आहे. वीज वितरणचे कर्मचारी दररोज थकबाकीदारांच्या दारात जावून बिलाची मागणी करीत आहेत. मात्र थकीत बिले नागरिक भरू शकत नाहीत.
तालुक्यातील १२९४० घरगुती ग्राहकांकडून १ कोटी ४२ लाख, व्यापारी ८३७ ग्राहकांकडून ४२ लाख, औद्योगिकचे ३६० ग्राहकांकडून १ कोटी ६० लाख, पोल्ट्रीधारक २७० ग्राहकांकडून २२ लाख ५४ हजार, सरकारी कार्यालयातील ८ लाख ५७ हजार रुपये, पाणी पुरवठ्याचे ४५ ग्रामपंचायतीकडून १ कोटी २४ लाख तर ग्रामपंचायतीचे स्टेट लाईटकडून १५० ग्राहकांचे ३ कोटी ७८ लाख असे एकूण ८ कोटी ७७ लाख ११ हजारांची रक्कम वीज वितरणची थकीत आहे.
थकीत बिल वसुलीसाठी वीज वितरणकडून हप्ते पाडून दिले आहेत. तरीही नागरिक अशी रक्कम भरत नसल्याने वीजवितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू केला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीची करवसुली झाली नसल्यामुळे वीज वितरणचे पाणी पुरवठा व स्टेट लाईटची बिले भरू शकत नाहीत.
सध्या वीज वितरण कंपनी थकीत बिलावर व्याजाची आकारणी सुरू केली आहे. व्याजाची आकारणी ग्राहकांना न परवडणारी आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक नागरिक धावपळ करून आपली थकीत रक्कम भरणा करीत आहेत.
चौकट :
ग्रामविकास खात्याकडून स्ट्रीट लाईटसाठी अनुदानच नाही
गावा-गावातील स्टेट लाईटचे बिल भरण्यासाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाकडून पन्नास टक्के रक्कम दिली जात होती. उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून घातली जात होती. धंदे मात्र गेली दोन वर्षे स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी ग्रामविकास खात्याकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींची स्ट्रीट लाईटची बिले थकीत आहेत.