इचलकरंजी : राज्यातील वाढलेल्या वीजदराच्या तुलनेत यंत्रमाग उद्योगासाठी सवलत देण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.वीजदर वाढीच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू असून, उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना यंत्रमाग उद्योगासाठी सवलत मिळावी, अशा आशयाचे निवेदन सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिल्याचे आमदार हाळवणकर यांनी सांगितले.आॅक्टोबर २०१४ पासून वाढलेल्या वीजदरासाठीचे अनुदान शासनाने रद्द केले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून वाढलेली वीज बिले उद्योगांना मिळाली. त्यावेळीसुद्धा राज्यभर आंदोलने झाली. म्हणून आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री यांची भेट घेऊन वाढीव वीजदराच्या अनुदानाची मागणी केली; पण शासनाने केवळ एक महिन्याचेच अनुदान दिले. त्यामुळे डिसेंबर २०१४ पासून पुन्हा वाढीव दराची बिले लागू झाली. त्यामध्ये सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. म्हणून आमदार हाळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पुन्हा निवेदन दिले. या निवेदनामध्ये, एक रुपये ८० पैसे प्रतियुनिट दराने वीज बिले यंत्रमागधारकांना मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे, असेही आमदार हाळवणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वीजदर सवलत लवकरच
By admin | Published: March 03, 2015 8:04 PM