कोल्हापूर: लॉकडाऊन काळात वीजबिलांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने एकट्या पश्चिम महाराष्ट्रात वीज थकबाकीचा आकडा १३५९ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरण ॲक्शन मोडवर आली असून त्यांनी वसुलीचा धडाका सुरू केला आहे. या वसुलीत अडथळा नको म्हणून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील वीज बिल भरणा केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या पहिल्या कडक लाॅकडाऊनपासून महावितरणसमोर थकीत वीज बिलांच्या वसुलीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आंदोलने, बैठकांनंतर कुठे मन वळवून बिलांची वसुली बऱ्यापैकी आवाक्यात येत असतानाच एप्रिलमध्ये दुसरा लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा बिलांचा भरणा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’ने आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी वसुली मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना सर्वच कार्यालयांना दिल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील मोडणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांनी तर ही मोहीम अधिकच गतिमान केली आहे. आता निर्बंध शिथिल झाल्याने जवळच्या वीज बिल भरणा केंद्रात जाऊन बिले भरण्यासह ऑनलाईन व ॲपद्वारेदेखील बिले भरण्याची सोय ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिली आहे.