शेखर धोंगडे।कोल्हापूर : चित्रपटांमध्ये नेहमीच एखादा सामाजिक संदेश असतो. त्याचे आपण कसे अनुकरण करतो, हे महत्त्वाचे ठरते. 'दंगल' हा चित्रपट कुस्ती खेळाने खूप गाजला.नेमका हाच धागा पकडून कोल्हापूर येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनीही 'दंगल' पाहिला आणि आपली केशरचना बदलून कबड्डीमध्ये पंगा घेण्याचा एक निश्चय केला.
यात बबिता या खेळाडूने खेळलेल्या कुस्ती व त्यासाठी घेतलेली मेहनत आणि केस कापून मुलांसारखी केलेली छबी ही खेळाडूंवर चांगलीच छाप पाडून गेली. चित्रपटातील तिची हीच भूमिका पाहून वालावलकर हायस्कूलमध्ये कबड्डी खेळणाऱ्या मुलींनीही आपणही असाच कबड्डीमध्ये पंगा घेण्याचा मनोदय केला.
या कबड्डी संघातील पहिली, सातवी, आठवी व नववीच्या तब्बल १७ मुलींनी आधी आपली केशरचना बदलत मुलांसारखा बॉयकट तयार केला. हुबेहुब बबितासारखी केशरचना करून आधी केसांचा अडसर दूर केला. खरंतर, मुलींचे आपल्या केसांवर आधी खूप प्रेम असते. लांबलचक केस असावेत, असे स्वत:बरोबरच मुलींच्या आई व घरच्यांना वाटत असते. मात्र, या सतराजणींनी खेळासाठी व स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुंदर केसांचा त्याग करत खेळाला स्थान देत संपूर्ण लूकच बदलला आहे.
खेळातूनच आपले सौंदर्य व कलागुण दाखवायचा निर्धार वालावलकर हायस्कूलच्या या मुलींनी केला आहे. दररोजचा सराव व अन्य विविध स्पर्धेतून त्या सज्ज झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आहार व व्यायामाकडे लक्ष देत, दैनंदिनीही बदलली आहे. यासाठी मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.कबड्डीचा संघ असाइयत्ता पहिली व सातवी, आठवी व नववीचा हा संघ असून, यात धनश्री तेली, समृद्धी बनसोडे, समृद्धी शिर्के, भुवनेश्वर माने, नंदिनी झेंडे, समृद्धी, बेळुडगी, क्रांती आपटे, वैष्णवी वडर, वृषाली बोडेकर, लक्ष्मी वडर, दीपाली धनवडे, निकिता यमकर, स्नेहा टोमके, श्रावणी मुळेक, स्वामिनी गावडे, किरण तेली, सिद्धी वडर, सई चौगुले यांचा समावेश आहे.आहारात बदलदररोज चपाती भाजी जेवणासह गूळ-शेंगदाणे, चणे, फुटाणे, हरभरे व मोड आलेली कडधान्ये तसेच फळ बंधनकारक आहे.योगा नि ट्रॅकिंगदररोज शाळा सुटल्यानंतर सायंकाळी ५.३० ते ८.०० पर्यंत मैदानावर प्रकाशझोतात या संघाचा आधी योगा कार्यक्रम, त्यानंतर सराव सामने सुरू असतात. महिन्यातून एकदा किंवा पावसाळ््यात, सुट्टीच्या काळात कोल्हापूर ते जोतिबा, पन्हाळा असा सायकलने प्रवास व तेथून ट्रॅकिंगचाही अनुभव या मुली घेत असतात.
कोणत्याही चित्रपटातील सकारात्मक संदेश व प्रेरणा घेऊन विचार केल्यास आपणही चांगले घडू शकतो, हे जाणून या खेळाडू मुलींनीही 'दंगल'मधून प्रेरणा घेत त्यातील खेळांचे डावपेच अंगीकारत व केशरचना बदलून, खेळात येणारा अडथळा दूर करून डॅशिंग व उत्कृष्ट खेळाडू बनण्याचा संकल्प करीत त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.- राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक, शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल,मुक्त सैनिक-कोल्हापूर.