कुरुंदवाड : शिक्षणाइतकेच साहित्याला महत्त्व आहे. साहित्य सद्भावना देते. साहित्य माणूस जोडण्याचे, घडविण्याचे काम करतो; देश घडविण्याची शक्ती साहित्यामध्ये आहे. त्यामुळे गावागावांतून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा जागर होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित सातवे संवाद साहित्य संमेलनात संमेलनाध्यपदावरून डॉ. लवटे बोलत होते. स्वागताध्यक्ष सरपंच चंद्रकांत चव्हाण होते. प्रारंभी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल घाटगे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. लवटे म्हणाले, जगातले शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी दररोज तयारी करीत असतात; मात्र आपल्या देशात शिक्षक तयारीत असतात. शिक्षण पैसे मिळविण्याचे साधन बनले आहे असे सांगून देशातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याबाबत परखडपणे मत मांडले. दुसऱ्या सत्रात लॉकडाऊन या कृषी केंद्रित सकारात्मक संदेश देणाऱ्या कादंबरीचे लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रकाश साखरे यांनी मुलाखत घेतली. तिसऱ्या सत्रात कृष्णात कोरवी, भरतकुमार पाटील यांचे कथाकथन झाले, तर अखेरच्या सत्रात कवयित्री माणिक नागावे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन झाले. संमेलनापूर्वी संयोजकांनी उपस्थितांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
यावेळी उपसरपंच संभाजी कोळी, विलास चौगुले, बाळासो हेरवाडे, सुनंदा कुलकर्णी, लता काकडे, राजगोंडा पाटील, दिलीप कोळी, आदी उपस्थित होते. डॉ. कुमार पाटील यांनी स्वागत केले, तर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी प्रास्ताविक केले. महावीर कांबळे यांनी आभार मानले.
फोटो - ०७०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मार्गदर्शन केले.