लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे ७० गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम करून अवघ्या चार तासांत त्यातील ६० गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला. राधानगरी तालुक्यात तर नदीतून पोहत जाऊन वीज वाहिन्या जोडून नागरिकांची गैरसोय टाळली.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोल्हापूरलाही बसला. महावितरणला आर्थिक झळ बसली नसली तरी ४५ हून अधिक ठिकाणचे विद्युत खांब पडले होते. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वीज वाहिनीवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे ७० हून अधिक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची भर पावसात खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बहुतांशी ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केला.
नदीपात्रात उतरून तुटलेल्या तारा जोडल्या
बिद्री बोरवडे फीडरची तुरंबे येथील नदी क्रॉसिंगची तुटलेली वीज वाहिनी सरवडे शाखा कार्यालयातील जनमित्र निवास पाटील, अजित बागडी यांनी धाडसाने नदीतून पाेहत जाऊन अभिजित चौगले व रूपेश सापळे यांच्या मदतीने जोडली. वीज वाहिनीवर पडलेली झाडे काढून तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली येथील खंडित वीजपुरवठा सुरळीत केला. शाखा अभियंता नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे धाडसी काम केले.
फोटो ओळी : वादळी पावसाने महावितरणचे विद्युत खांब पडले, विद्युत वाहिनी तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. सरवडे (ता. राधानगरी) शाखेच्या कर्मचाऱ्यांंनी पावसात विद्युत वाहिन्या दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत केला. (फोटो-१७०५२०२१-कोल-सरवडे व सरवडे०१)