गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहर व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणची उपकेंद्रे, वीज वाहिन्या, वितरण रोहित्रे पाण्यात अडकली. तर विजेचे खांब वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा बाधित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. २३) पासून रात्रंदिवस काम करीत हा पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. यात कसबा बावडा, शुगर मिल, बापट कॅम्प येथील ३३-११ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला हाेता. त्याकरिता सर्किट हाऊस येथून पर्यायी व्यवस्था करून येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे साडेसात हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात यश आले. यासाठी सहायक अभियंता प्रवीण सूर्यवंशी, विजय जाधव, सुनील चाटे, सचिन माने, रोशन पारधी, प्रणव पाटील, करण पायमल, आदींनी कामगिरी पार पाडली.
चौकट
फुलेवाडीच्या बालिंगा कक्षात जनमित्रांनी बोटीतून प्रवास करीत पुराच्या पाण्यात उतरून ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा बिघाड दुरुस्त करून पाडळी गावठाणचा वीज पुरवठा सुरळीत केला.