कोल्हापूर : चोख नियोजन आणि समन्वयातून कोल्हापूर व सांगलीत महावितरण यंत्रणेला पुराचा जबर फटका बसूनही निर्णय प्रक्रियेतील गतिमानतेमुळे विक्रमी वेळेत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १८ पैकी १७ आणि सांगली जिल्ह्यात १७ पैकी १५ उपकेंद्रांतील तीन लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. कोल्हापुरातील ४०० आणि सांगलीतील १२००, असे १६०० ग्राहकांची वीज जोडणी शिल्लक आहे.
महापुरात कोल्हापूर, सांगलीची ३५ हून अधिक उपकेंद्रे बाधित झाली. ३१५ गावांतील ४ लक्ष २७ हजार ग्राहकांच्या वीजपुरवठा विस्कळीत झाला. कोल्हापूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे, सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी स्थानिकस्तरावर आपत्कालीन नियोजन केले. बारामती, सोलापूरहून वीजखांब, ऑइल, वीज तारा इ. साहित्य उपलब्ध करून घेतले. पुण्याच्या वीज कर्मचारी पथकांनी आंबेवाडी, गडहिंग्लज व जयसिंगपूर येथे दुरुस्ती कार्य सुरू केले आहे. बारामतीहून आणखी तीन पथके लवकरच दाखल होणार आहेत.
चौकट
वरिष्ठांच्या सतर्कतेमुळे महावितरणची महापुरावर मात
कोल्हापूर, सांगलीत महापुराने थैमान घातल्यानंतर चारच दिवसांत महावितरणने वीजपुरवठा अतिशय कठोर व अविश्रांत दुरुस्ती कामांतून पूर्वपदावर आणला आहे. यामध्ये मागील महापुराचा अनुभव आणि वरिष्ठ प्रशासनाची सतर्कता मोलाची ठरली आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी कोल्हापूर परिमंडळातील वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत सातत्याने लक्ष ठेवले व मार्गदर्शन केले. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे कोल्हापूर येथेच मुक्कामी राहून यंत्रणा हलविल्यानेच महापुराच्या तडाख्यानंतर विक्रमी वेळेत वीजपुरवठा पूर्वपदावर आला.