कोल्हापूर : चित्रपटाच्या माध्यमातून येणारी सत्यकथा तुम्हाला शब्दांपलीकडे नेते, हृदयाला भिडते. व्यावहारिक जगण्याच्या दोन पाऊल पुढे जावून जीवनाचा अर्थ सांगते. मन आणि समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद असलेला हा चित्रपट आता डिजीटल माध्यमांद्वारे आपल्या हाताच्या बोटावर आला आहे. अशा परिस्थितीत आपण कोणते चित्रपट बनवावेत व पाहावेत याबद्दल जास्त जागरूक राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(किफ्फ)चे गुरुवारी ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भावे यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कलेला राजाश्रय दिलेल्या कोल्हापूरचा आणि पुरस्काराचा मला अभिमान आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, विजयमाला पेंटर उपस्थित होत्या.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात गुरुवारी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयमाला पेंटर, चंद्रकांत जोशी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मेघराज राजेभोसले, दिलीप बापट उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)
भावे म्हणाल्या, आमच्या चित्रपटात नाचगाणी, सुंदर तारेतारका नाहीत पण आम्ही माणसाच्या मनाला भिडणारी खरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. ‘बाई’ लघुपटाने स्त्रीला स्वत:च्या ताकदीची जाणीव करून दिली. ‘कासव’ने तरुणाईच्या मानसिकतेचे दर्शन घडविले. मी फक्त स्त्री आहे म्हणून नव्हे तर माणूस म्हणून चित्रपट बनवते. चित्रपट या माध्यमाचे महत्त्व शासनालाही कळावे आणि मुक्त वातावरणात चित्रपट निर्माण व्हावेत, रसिकांपर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा आहे.
सुभाष घई म्हणाले, चित्रपट म्हणजे केवळ गंमत नव्हे तर जागरण आणि समाजमनाचा आरसा आहे. या चित्रपटांनी सामाजिक आशय दिला, देशाची एक ता, संस्कृती दाखविली. कोल्हापूरसारख्या कला, सांस्कृतिक शहरामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे जगभरातील चित्रपट तुमच्यापर्यंत आले आहेत. ते पाहण्यासाठी चांगले रसिक बना. किफ्फ हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी शासनाने स्थानिक प्रशासनाने, नव्या पिढीने, उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.
प्रास्ताविकात चंद्रकांत जोशी यांनी चित्रपट क्षेत्रात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यासह कोल्हापूरकरांनी दिलेल्या योगदानाच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला. जिल्हाधिकारीअविनाश सुभेदार यांनी मान्यवर व रसिकांचे स्वागत केले. दिलीप बापट यांनी मानपत्राचे वाचन केले.
सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशन ग्रुपमधील कलाकारांनी बाबूराव पेंटर यांच्या चित्रपटातील किचक वधाचा प्रसंग सादर केला. याचवेळी बाबूराव पेंटर यांच्या जीवनावर व चित्रपटातील प्रसंगांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. (छाया : दीपक जाधव)
सोशल मीडियाचा भस्मासूर..भावे म्हणाल्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकाची निर्मिती असलेल्या चित्रपट कलेने खूप मोठी स्थित्यंतरे पाहिली आहेत. आजचे चित्रपट मनोरंजन, भडकपणा आणि नाचगाण्यांच्या दिशेनेच जात आहेत. भस्मासूराच्या कथेप्रमाणे हातात आलेली डिजीटल टेक्नॉलॉजी आपल्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर आपल्याला भाजून टाकणार, मनोविकृत करणार, बिघडवणार आहे का याचा विचार करावा करून हाताळले पाहिजे.
* चित्रपट महोत्सवात आजसकाळी १० वाजता सुमित्रा भावे यांच्याशी मुक्त संवादचित्रपट (सकाळी दहा वाजल्यापासून)स्क्रीन १ टॉकिंग विथ द विंड (श्रीलंका) , पर्सन शॉपर (युएसए), पॅन फ्लोवज २८ (रशिया), सर्वनाम - मराठी, द हाऊस आॅफ द ४१ स्ट्रीट (इराण)स्क्रीन २ : झाशांद फरांद (इराणी), किफफ शॉर्ट फिल्म, लव इज आॅल यु निड (डेन्मार्क), इंबरन्स आॅफ सरपेंट (कोलंबिया), कलियुग भारतीयस्क्रीन ३ : आॅन द पिसफुल पिक (व्हिएतनाम), द प्रोफेसी (व्हिएतनाम), मास्ट्रो (फ्रेंच), वास्तुपुरुष- भारतीय