अधिक माहिती अशी की, बामणी येथे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे विद्युत वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश चव्हाण व त्यांचे सिद्धनेर्ली शाखा पथकातील सहकारी सहायक अभियंता अभिलाषा बारापञे, प्रधान तंञज्ञ के. आर. मुल्ला, वरिष्ठ तंत्रज्ञ अमर पाटील, तम्माना पुजारी हे बामणी येथे एप्रिल २०२० पासून आजतागायत थकीत वीज बिल न भरलेल्या नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्यास गेले होते. यावेळी त्यांनी जनार्दन कृष्णा मगदूम यांना थकीत वीज बिल भरले असल्यास पावती दाखवा अथवा एकूण बिलाच्या निम्मे तरी बिल भरा, असे सांगितले असता जनार्दन मगदूम यांनी माझे कनेक्शन कट कसे करता ते बघतो, अशी धमकी दिली व वीज बिल भरण्यास नकार दिला.
त्यानंतर चव्हाण हे मगदूम यांच्या घरातील वीज कनेक्शन कट करून बाहेर पडले असता मगदूम यांनी आपल्या मोबाईलवरून आपले सहकारी मारुती पांडुरंग पाटील व सुभाष कृष्णा पाटील यांना मगदूम काॅलनीत बोलावून घेतले. यावेळी मारुती पाटील यांनी जोपर्यंत सरकारचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन तोडायचे नाही. तसेच ज्यांच्या घरातील कनेक्शन तोडले आहे ते जोडून द्या, अन्यथा बारापत्रेसह तुम्हा सर्वांना डांबून ठेवून मारणार असे सांगत सुभाष पाटील व मारुती पाटील यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तर अन्य तीन-चार अनोळखी लोक अंगावर धावून येत होते, असे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.