कोल्हापूर: पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. डोंगरी तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे, तर १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिकोत्रा धरण शंभर टक्के भरले असून काळम्मावाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.गणेशाच्या आगमनाबरोबरच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. दोन दिवसापासून रिपरिप पडणाºया पावसाने बुधवारपासून मात्र जोर धरला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत असून हवेतही गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २७६ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक ८४ मिलीमीटर पाऊस एकट्या गगनबावडा तालुक्यात झाला आहे. हातकणंगले सर्वात कमी ३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत चालली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणातून विसर्ग सुरु असल्याने पाणीपातळी वाढत असून असाच जोर राहिल्यास सर्वच १४ नद्या पुन्हा एकदा पात्राबाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.पंधरा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने आगमन केल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. अतिवृष्टी आणि महापुरानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने माळरानासह बागायती पट्ट्यातील पिकेही करपू लागली होती. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेषता महापुराच्या तडाख्यातून वाचलेली भूईमुग आणि भात या पिकांना या पावसाची नितांत आवश्यकता होती.