कोल्हापूर दि. 02 : वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला.
वन्यजीव विभाग, समाजिक वनीकरण, वन विभाग, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्यावतीने आयोजित केलेली ही प्रभात फेरी वन विभागाच्या कार्यालयापासून सुरुवात होऊन पुढे महावीर कॉलेज, सीपीआर चौक, महापालिका, शिवाजी चौकातून पुढे भवानी मंडप येथे समारोप करण्यात आला.
या प्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्यासह विभागीय वन अधिकारी माणिकराव भोसले, सहायक वन संरक्षक, विजय गोसावी, विद्यापीठाचे सहप्राध्यापक अमोल कुलकर्णी, करवीरचे आरएफओ विश्वजीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरतसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रभात फेरीमध्ये पेड लगाओ - देश बचाओ, रक्षण करा रक्षण करा - वन्य प्राण्यांचे रक्षण करा यासह अनेक घोषवाक्यांनी परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला.
वने व वन्य जिवांचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी या प्रभात फेरीबरोबरच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छ कोल्हापूर तसेच ट्रेकिंग असे उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले.
सर्व स्पर्धातील विजेत्यांचे बक्षीस वितरण 7 ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार असल्याचेही डॉ. शुक्ल म्हणाले.