कोल्हापूर : प्रेमाच्या नावाने अश्लील चाळे करणाऱ्या युवक-युवतींचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे रंकाळा घाट येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रेमीयुगुलांची पळताभुई झाली.हिंगणघाट येथील घटना असो किंवा मुलींवरचे होणारे अत्याचार पाहता मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी अनोखे आंदोलन केले.हलगीचा गजर करीत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ‘खऱ्या प्रेमाला आडोशाची गरज काय?’, ‘हिंगणघाटसारख्या घटनांमधून जाताहेत तरुणांचे बळी, सावध हो मुली, अशी येऊ नको कोल्हापूरवर पाळी’ असे फलक हातामध्ये घेऊन ते रंकाळा घाट येथे आले.
कॉलेज, क्लासेस चुकवून आलेल्या प्रेमीयुगुलांना गुलाबाचे फूल देऊन ‘तुमचे करिअर करण्याचे हे वय आहे, असा वेळ घालवू नका. आई-वडील कष्टाने तुम्हाला शिकवत आहेत, त्यांची जाणीव ठेवा.’ अशी शांततेने विनंती करून त्यांचे प्रबोधन केले.आंदोलनकर्त्यांना पाहून अनेक प्रेमीयुगुलांनी काढता पाय घेतला. आंदोलनात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, संजय ढाले, श्रीकांत मनोळे, बाजीराव पाटील, राजू बुदले, मनीष कुलकर्णी, महेश इंगवले, राजू कदम, सचिन सुतार, रवींद्र घाटगे, प्रकाश घाटगे, सुशांत शिंदे, अनिल बोंद्रे यांचा सहभाग होता.
आमचा प्रेम करणाऱ्यास विरोध नाही. सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसा, मात्र आडोशाला बसून अश्लील चाळे करण्यास आमचा विरोध आहे. आंदोलनाद्वारे मुला-मुलींमध्ये प्रबोधन करणे, हा आमचा उद्देश आहे.- अशोक देसाई, अध्यक्ष, हिंदू युवा प्रतिष्ठान.