कोल्हापूर : ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील आज, शुक्रवारी झालेल्या सामन्यांत प्रॅक्टिस क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळावर २-१ अशी मात केली; तर साईनाथ स्पोर्टस्ने प्रॅक्टिस क्लब ‘ब’वर निसटता विजय प्राप्त केला.छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ प्रॅक्टिस क्लब ‘अ’विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून प्रॅक्टिस ‘अ’च्या महेश पाटील, रोहन खिरुगडे, अभिनव साळोखे, ओंकार पाटील, नीलेश सावेकर, नीलेश ढोबळे यांनी खोलवर चढाया करीत ‘शिवाजी’वर दबाव निर्माण केला. ५ व्या मिनिटास प्रॅक्टिस ‘अ’च्या महेश पाटीलने आलेल्या संधीवर गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. ‘शिवाजी’कडून सागर भातकांडे, शिवतेज खराडे, आकाश भोसले, तेजस शिंदे, संदीप पोवार, स्वप्निल पाटील यांनी सामन्यात बरोबरी करण्यासाठी खोलवर चढाया करीत प्रॅक्टिस ‘अ’ची बचावफळी भेदण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, महेश पाटील, अभिषेक बाबर, ओंकार पाटील यांनी त्या निष्प्रभ केल्या. ३८ व्या मिनिटास ‘शिवाजी’च्या स्वप्निल पाटीलने मिळालेल्या संधीवर अप्रतिम गोलची नोंद करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून शिवतेज खराडे, आकाश भोसले, सागर भातकांडे यांनी आघाडी मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्रॅक्टिस ‘अ’चा गोलरक्षक करण शिंदे याने ते फोल ठरविले. प्रॅक्टिस ‘अ’कडून ऋषिकेश जठार, नीलेश ढोबळे, महेश पाटील यांनी केलेल्या चढाया ‘शिवाजी’चा गोलरक्षक गुरदेवसिंग याने उत्कृष्ट गोलरक्षण करीत वाचविल्या. शेवटपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी ८६ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘अ’च्या नीलेश ढोबळेने गोल नोंदवीत २-१ अशा गोलफरकाने सामना जिंकला. दुसरा सामना प्रॅक्टिस क्लब ‘ब’ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचत गोल करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. २४ व्या मिनिटाला ‘साईनाथ’च्या ऋषिकेश पाटीलने मैदानी गोल करीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिस क्लब ‘ब’कडून स्वप्निल करपे, प्रतीक बदामे, प्रथमेश यादव, सागर हुजरे, अमोल पाटील यांनी खोलवर चढाया केल्या, तर ‘साईनाथ’कडून मनोज अधिकारी, नीलेश साळोखे, वैभव सावंत यांच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या.दोन्ही संघांनी उत्तरार्धात वेगवान चाली रचत सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरपर्यंत प्रॅक्टिस ‘ब’च्या खेळाडूंना सामन्यात बरोबरी करता आली नाही. त्यामुळे ‘साईनाथ’ने प्रॅक्टिस ‘ब’वर १-० असा निसटता विजय मिळविला. (प्रतिनिधी)
प्रॅक्टिस ‘अ’ची ‘शिवाजी’वर मात
By admin | Published: December 13, 2014 12:07 AM