कोल्हापूर : श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना पालथे झोपण्याचा सराव करण्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे यांनी दिल्या. डॉ. साळे यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांतील काेविड काळजी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
इतर वेळी रोजच्या व्हीसी, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर जाणे शक्य होत नसल्याने डॉ. साळे यांनी गुरुवारच्या सुटीच्या दिवशी थेट चंदगड गाठले. कानूर प्राथमिक आरोग्य केंद्र, आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील केंद्र आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाला त्यांनी भेटी दिल्या.
थेट रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. सर्व ठिकाणी चांगली उपचार प्रक्रिया राबवली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे, अशा रुग्णांना दिवसातून काही वेळ पालथे झोपवल्यास त्यांना ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होतो. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. साळे यांनी केल्या.