कोल्हापूर - प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढणार असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा. पण, सोलापूरला लढायचा आंबेडकरांचा निर्णय हा योग्य नाही, त्यांना तेथे मते पडणार नाहीत. वंचित आघाडीचे उमेदवार जेवढी मते खातील, त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होईल. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही शिवसेना-भाजपाला पूरक अशीच आहे, असेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे. तसेच, वंचित आघाडी ही महाराष्ट्राला पर्याय देणारी आघाडी नाही, असेही आठवलेंनी म्हटले.
मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती. परंतु, आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत राहणार, कारण मोदींनी कामे केली आहेत. हवा कुठे वाहते त्या बाजूने मी जातो. सध्या काँग्रेसची हवा नाही आणि राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकत नाहीत. त्यांनी विरोधी पक्षनेते व्हावं, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राला पर्याय देणारी आघाडी नाही. तर, प्रकाश आंबेडकरांनीसोलापूरमधून निवडणूक लढवू नये, असा सल्लाही आठवलेंनी दिला. सोलापूरमध्ये त्यांना मते पडणार नाहीत, तरीही त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. कारण, सोलापूरमध्ये आमच्याही सभांना गर्दी होते, पण त्याचे मतात रुपांतर होत नाही, असे आठवलेंनी सांगितले. तसेच, वंचित आघाडीचे उमेदवार जेवढी मते खातील, त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होईल. त्यामुळे वंचित आघाडी ही शिवसेना-भाजपाला पूरक अशीच आहे, असेही0 आठवलेंनी म्हटले.
दरम्यान, आठवले यांनी नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. तसेच पवारांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असा मजेशीर टोमणाही रामदास आठवेलंनी पवारांना लगावला होता.