काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे -पक्षाकडून घोषणा : इचलकरंजीत जल्लोष; पक्ष मजबूत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:44 AM2019-01-24T01:44:28+5:302019-01-24T01:48:02+5:30
कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील कॉँग्रेसचे १३ नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. त्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर इचलकरंजीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कोल्हापूर/इचलकरंजी : कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील कॉँग्रेसचे १३ नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. त्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर इचलकरंजीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आवाडे यांच्या निवडीची घोषणा रात्री उशिरा झाल्यानंतर इचलकरंजी येथे काँग्रेसप्रेमी व आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
या निवडीमुळे इचलकरंजीच्या राजकारणात आवाडे गटाला उभारी मिळाली आहे.
गेली २० वर्षे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे होती. अध्यक्षपद काँग्रेस संघटनेत व जिल्ह्याच्या राजकारणातही महत्त्वाचे मानले जाते. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शरद पवार यांनी १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांशी नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने काँग्रेस एकाकी झाली होती. अशा अडचणीच्या काळात पक्षाने पी. एन. पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पुढच्या काळात त्यांच्या अध्यक्षपदाला ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आव्हान दिले. परंतु पी. एन. यांनी पक्ष संघटनेवेळी आपली मान कायम राखली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील व आवाडे गट एकत्र झाला. त्यावेळी आवाडे यांना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु पक्षाने जिल्हाध्यक्षपदी पी. एन यांना कायमच ठेवले. ही जबाबदारी अन्य कोणालाही द्यावी, असे पी. एन. पाटील यांनी प्रदेश काँग्रेसला सुचविले होते.
आता जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे आणि माजी खासदार जयवंतराव आवळे व आवाडे व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यामध्ये मनोमिलन झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर या सर्व नेत्यांमध्ये एकोपा घडवून आणला. त्यामुळेच आवाडे यांच्या निवडीचे पी. एन. यांनीही स्वागत केले आहे.
------------
इचलकरंजीत आवाडे यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर जमून त्यांचे अभिनंदन केले. बंगल्यासमोर फटाक्याची आतषबाजी केली.
आवाडे यांची निवड झाल्याचे वृत्त रात्री साडेदहा वाजल्यानंतर शहरात पसरले. त्यांच्या बंगल्याकडे प्रमुख कार्यकर्त्यांनी धाव घेतली. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष विलास गाताडे आदींनी पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना प्रकाश आवाडे यांनी पेढा भरविला तर त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे यांनी औक्षण केले. मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या बंगल्यावर जल्लोष सुरू होता.
जिल्ह्यात किमान सहा आमदार निवडून आणू
पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यातील आणि जिल्ह्यातील पक्षाचे नेते, सहकाºयांच्या मदतीने जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून किमान सहा आमदार निवडून येतील, यासाठी सर्वस्वी ताकद पणाला लावत सर्व नेत्यांना बरोबर घेऊ, असा विश्वास प्रकाश आवाडे यांनी निवडीनंतर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश आवाडे यांचे अभिनंदन करुन मावळते जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील म्हणाले, 'तब्बल २० वर्ष या पदावर काम करण्याची संधी मला पक्षाने दिली. हा मोठा बहुमान आहे. आवाडे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी सर्वजन मिळून चांगले काम करु'.
समन्वयक समितीत सतेज पाटील
पक्षाने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या २९ सदस्यीय निवडणूक समन्वयक समितीत आमदार सतेज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना यानिमित्ताने मोठी संधी मिळाली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे हे या समितीचे प्रमुख आहेत.