कोल्हापूर : आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आपला विचार करावा, असा आग्रह इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यासंदर्भात काही आश्वासन मिळाल्यानंतरच आवाडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे जबाबदार सूत्रांकडून सांगण्यात आले.तिथे भाजपाचे सुरेश हाळवणकर आणि आवाडे यांच्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले आहेत. आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत रविवारी रात्री झालेल्या चर्चेत भाजपाचे माजी आमदार हाळवणकर यांच्याबद्दल तक्रारी केल्याचे समजते. त्यांचा माझ्या प्रत्येक कामात हस्तक्षेप होत आहे. अशा स्थितीत सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण आम्हाला कोणते संरक्षण देणार आहात, अशीही विचारणा आवाडे यांनी केली.त्यासंदर्भात काही ठोस शब्द घेतल्यानंतरच आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील निवासस्थानी अर्धा तास चर्चा केल्यानंतर शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले.मुख्यमंत्री शिंदे यांची आवाडे यांच्याशी कोल्हापुरात शनिवारी सायंकाळी चर्चा झाली; परंतु, तरीही ते माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते निवडणूक लढवणार, अशी हवा झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमच्या अडचणी, भावना त्यांच्या कानावर घाला आणि निर्णय घ्या, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यावर आवाडे यांनी मी सर्वांचाच मान राखून निर्णय घेतो, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्र्यांशी त्यांची येथील निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राहुल आवाडे, मौसमी आवाडे, किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, मंत्री शंभूराज देसाई, विनय कोरे, विजय शिवतारे, रामदास कदम आदी उपस्थित होते. चर्चेवेळी मात्र आवाडे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री एवढेच उपस्थित होते.
डिजिटलवर आमच्या फोटोचीही ॲलर्जी..
गेल्या पाच वर्षांत खासदार माने यांनी आपल्याला कोणत्याच टप्प्यावर विश्वासात घेतलेलं नाही. त्यांच्या डिजिटल फलकावरही त्यांनी कधी आमचा फोटो लावला नाही, एवढी त्यांना आवाडे यांची ॲलर्जी होती. इचलकरंजीच्या अनेक कामांत त्यांनी आमच्या राजकीय विरोधकांनाच बळ दिले. महापालिकेतील अनेक कामे होऊ नयेत, यासाठी त्यांनी ताकद लावली. कृष्णा योजनेची पाइपलाइन बदलण्याचे काम असो की सहा जलकुंभांचे काम मंजूर असतानाही ते त्यात आडवे पडल्याची नाराजी आवाडे यांनी यावेळी बोलून दाखवल्याचे समजते.
मूळ दुखणे..इचलकरंजी शहराच्या राजकारणात खासदार माने यांनी भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा हात घट्ट धरला आहे. विधानसभेलाही ही जोडी एकत्र राहू शकते. हाळवणकर आणि आवाडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. त्यात माने हे हाळवणकर यांना मदत करत असल्याचा रागही आवाडे यांच्या उमेदवारीमागे होता व आहे.
असाही एक गुंता..खरंतर, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल आवाडे हेच संभाव्य उमेदवार म्हणून तयारी करत आहेत. या वेळेलाही त्यांनी तशी घोषणा केली होती; परंतु, कोणत्याच पक्षाकडून त्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. शिवाय राहुल उभे राहिले आणि त्यांनी माघारच घेतली नाही तर भाजपा व मुख्यमंत्र्यांशी असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून स्वत: प्रकाश आवाडे यांनीच निवडणूक लढविण्याची घोषणा केली व आवाडे गटाची ताकद दाखवून माघार घेतली.