कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ॲड. प्रकाश पांडूरंग देसाई (बोरगाव-देसाईवाडी) यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली शरद पाटील (अर्जूनवाड) यांची बिनविरोध निवड झाली. दोघांनाही वर्षभराचा कालावधी मिळणार आहे.सभापती भारत पाटील-भुयेकर व उपसभापती शंकर पाटील यांनी नेत्यांनी नेमून दिलेला कालावधी संपल्याने राजीनामा दिला होता. आघाडीमध्ये ठरलेल्या फार्मुल्यानुसार दुसऱ्या वर्षी जनसुराज्य शक्ती पक्षाला सभापती पदाची संधी मिळणार होती. पक्षात ॲड. देसाई यांच्यासह पांडूरंग काशीद हेही इच्छुक होते. दोन दिवस त्यांनी जोरदार फिल्डींग लावली होती, पण पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी ॲड. देसाई यांना संधी दिली.उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार होते. त्यांच्याकडून फारसे इच्छुक नसले तरी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांना सोडून ‘बिद्री’च्या निवडणूकीनंतर माजी आमदार के. पी. पाटील गटात सामील झालेल्या सोनाली पाटील यांना संधी देऊन ‘के. पी.’ यांनी ‘राधानगरी’ मध्ये आपल्या गटाला ताकद देण्याची भूमिका घेतली.नूतन अध्यक्ष ॲड. प्रकाश देसाई म्हणाले, बाजार समितीमधील शेतकऱ्यांसह सर्वच घटनांकाना सोबत घेऊन कामकाज करत असताना उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. यावेळी मावळते सभापती भारत पाटील-भुयेकर, संचालक सुर्यकांत पाटील, नंदकुमार वळंजू, शिवाजी पाटील, सुयोग वाडकर, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सचिव जयवंत पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश देसाई यांची बिनविरोध निवड
By राजाराम लोंढे | Published: June 24, 2024 4:19 PM