किणी : जिद्द व चिकाटीच्या जोरावर वाठार वडगांव (ता. हातकणंगले) येथील प्रणाली रमेश पाटील हिने केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश संपादन केले आहे. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल लागला.
प्रणालीचे मराठी माध्यमातून वाठार येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदीर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल व बारावीपर्यतचे शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झाले. युपीएससीचे ध्येय ठेवून प्रणालीने पुण्यातील सिध्दी विनायक महाविद्यालयात बी. ए. ची पदवी तर भूगोल विषयातून एम.ए.ची पदवी सर परशुराम भाऊ महाविद्यालयात घेतली. किणी हायस्कूलमध्ये असतानाच युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले.
दिल्लीला जाऊन क्लास करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसतानासुद्धा अध्यात्म गरु नरेंद्राचार्य, चानक्य मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली सिनीयर आणि मित्र, मैत्रिणींच्या ग्रुप चर्चेतून यश मिळाल्याचे प्रणालीने सांगितले प्रणालीचे वडील रमेश पाटील हे गावोगावी जाऊन घरगुती साहित्याची विक्री करतात. तर आई घरकाम करते. तिच्या उज्वल यशाने सर्वत्र तिचे अभिनंदन केले जात आहे.