कोल्हापूर : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचे रावसाहेब दानवे हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शनिवारी बिंदू चौकात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला कोल्हापुरी चपलांनी मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाईच्या विरोधातही केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, अन्नदात्यावर आरोप करणाऱ्या दानवेंना कदाचित चांगला उपचार करण्याची गरज आहे. शासनाच्या अनेक वैद्यकीय योजना मोफत राबविल्या जातात. त्यातून त्यांच्यावर उपचार करावेत.
दिल्लीतील अन्नदात्यांच्या आंदोलनाचा अवमान करणे, खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे पाप त्यांनी केले. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी सर्व देशवासीयांना अनेक मोठी स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात सत्तेवर येताच प्रत्येक क्षेत्रात महागाईचा आलेख वाढतच गेला आहे. डिझेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यांची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, अवधुत साळोखे, दिलीप जाधव, शशिकांत बीडकर, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, विराज पाटील, राजू जाधव, हर्षल सुर्वे,राजू यादव, सर्जेराव पाटील, संदीप पाटील, मंजित माने आदी उपस्थित होते.