कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याला अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नाही, त्यामुळे बुधवारी सायंकाळी त्याची सुटका होऊ शकली नाही.कागदपत्रांची पूर्तता होताच आज, गुरुवारी त्याचा कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी कोरटकरची आणखी सखोल चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी सावंत यांनी केली.कोरटकर याने २५ फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या गुन्ह्यात त्याला २५ मार्च रोजी अटक झाली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.त्यानंतर, त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.कोरटकरची पुन्हा चौकशी करा : सावंतकोरटकर याला इंद्रजीत सावंत यांचा मोबाइल नंबर कोणाकडून मिळाला? फोन केला, तेव्हा त्याच्यासोबत कोण होते? कोणाच्या सांगण्यावरून त्याने सावंत यांना धमकावले? पसार काळात त्याला कोणी आर्थिक मदत केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याची पुन्हा सखोल चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता, अटीशर्तीसह जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:58 IST