Kolhapur- इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: कोरटकर हजर राहा, उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:20 IST2025-03-11T12:19:34+5:302025-03-11T12:20:09+5:30
नागपूर पोलिसांमार्फत पाठवली नोटीस, आज सुनावणी

Kolhapur- इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: कोरटकर हजर राहा, उच्च न्यायालयाचे आदेश
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस उच्च न्यायालयाने बजावली. सोमवारी (दि. १०) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश राजेश पाटील यांनी याबाबत निर्देश दिले. कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज, मंगळवारी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.
संशयित कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हा दाखल होताच कोरटकरने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळवला. याविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली.
तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कोरटकर याच्या अटकेची गरज व्यक्त केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोरटकरने स्वत: किंवा वकिलांकरवी मंगळवारी न्यायालयात हजर राहावे, अशी नोटीस न्यायाधीशांनी बजावली. नागपूर पोलिसांमार्फत ही नोटिस बजावण्यात येणार आहे.
जामिनाचा आज फैसला
कोरटकर याच्या जामिनावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपत आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयातही आज सुनावणी होईल. दोन्ही न्यायालयातील सुनावणीमध्ये कोरटकरच्या जामिनाचा फैसला होणार आहे.
फॉरेन्सिकला कोरटकरच्या अटकेची प्रतीक्षा
फॉरेन्सिकच्या अधिका-यांनी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाची तपासणी केली आहे. कोरटकर याच्या अटकेनंतर त्याच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. त्यानंतर दोघांच्या संवादाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल. स्वर, बोलण्याची पद्धत, आवाजातील चढ-उतार याचे शास्त्रीय विश्लेषण करून आवाजाची पडताळणी केली जाणार आहे.
सावंत यांच्या जिवाला धोका : इंडिया आघाडीचे निवेदन
कोरटकर मोकाट असल्याने इंद्रजीत सावंत यांच्या जिवाला धोका आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी न्यायालयात सादर करून कोरटकरच्या अटकेसाठी प्रयत्न करावा, या मागणीचे निवेदन इंडिया आघाडीने सोमवारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले. यावेळी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते विजय देवणे, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, हर्षल सुर्वे, मधुकर पाटील, उदय नारकर, प्रज्वल गोडसे-पाटील, राजू यादव, अवधूत साळोखे, आदी उपस्थित होते.