कोल्हापूर : प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा अपमानजनक उल्लेख करून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी सावंत यांच्या वकिलांनी कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. कळंबा कारागृहातील अधिकारी अविनाश भोई यांच्यामार्फत सोमवारी (दि. ७) अंडासेलमध्ये त्याला नोटीस पोहोच केली.
दरम्यान, जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणीत झाली. कोरटकर कारागृहातच सुरक्षित असल्याने त्याला जामीन मिळू नये, असा युक्तीवाद ॲड. असीम सरोदे यांनी केला. पुढील सुनावणी बुधवारी (दि. ९) होणार आहे.महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा न्यायालयात केलेल्या जामीन अर्जांमध्ये सावंत यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली. सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांच्यावर जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना पोलिसांकडून अटक झाली होती, असा उल्लेख त्याच्या जामीन अर्जात केला आहे.सावंत यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याने त्याला ॲड. योगेश सावंत यांच्यामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याचे सावंत यांचे वकील सरोदे यांनी सांगितले. तसेच त्याने कोणाच्या सांगण्यावरून सावंत यांच्याबद्दल अपमानजनक माहिती लिहिली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कोरटकर कारागृहातच सुरक्षित : ॲड. सरोदेकोरटकरच्या जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायाधीश (२) डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. ॲड. सौरभ घाग यांनी गुन्ह्याचे स्वरूप आणि तपास पूर्ण झाल्याचे सांगत जामीन मंजूर करण्याची विनंती केली. तसेच जामीन मिळणे हा त्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा युक्तीवाद केला. जामीन मंजूर झाल्यास तो पळून जाऊ शकतो. तसेच पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मिळू नये, असा युक्तीवाद सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी केला.फिर्यादी सावंत यांचे वकील सरोदे यांनी कोरटकरच्या जामिनाला जोरदार विरोध केला. त्याच्यावर कोर्टाच्या आवारात दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. सध्या तो कारागृहातच सुरक्षित असल्याने जामीन देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी ॲड. घाग आणि सरोदे यांच्यात खडाजंगी झाली.
नुकसान भरपाईची रक्कम शहीद जवानाच्या नातेवाईकांना देणारकोरटकर याला पाठवलेल्या नोटीसमध्ये नुकसान भरपाईच्या रकमेचा उल्लेख केलेला नाही. मात्र, जी रक्कम मंजूर होईल ती मराठी रेजिमेंटच्या शहीद जवानाच्या नातेवाईकांना देणार असल्याचे फिर्यादी सावंत यांच्या वतीने ॲड. सरोदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.