कोल्हापूर : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मतदारांशी संपर्क व निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. त्याच्या जोरावरच या मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे अपक्ष उमेदवार व अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे (आयएसटीई) उपाध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. देसाई म्हणाले, माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार काकासाहेब देसाई यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू केले. सध्या मी आयएसटीईचा उपाध्यक्ष असून, माझी इंजिनिअरिंग डीन्स कौन्सिलवर भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मी तयारी केली आहे. अभियांत्रिकी शाखेतील १३ हजार शिक्षकांची नोंदणीसह मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मोर्चेबांधणी केली आहे. या मतदारसंघात फेब्रुवारीपर्यंत ५७ हजार ७०० इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यापैकी अभियांत्रिकी शाखेतील १३ हजार शिक्षकांची नोंदणी मी केली आहे. खासगी विनाअनुदानित संस्थांमधील सेवा करिअर अॅडव्हान्समेंटसाठी ग्राह्य धरणे, एआयसीटीईची सी. ए. एस. योजना राज्यात लागू करणे, आदी प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी अस्तित्वात असणारी अन्यायकारक कालबाह्य पदोन्नतीची योजना, टेक्निकल विभागात येणारे नवीन अभ्यासक्रम व त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न, निवडश्रेणी, अनुदानित संस्थांना मिळणारे अपुरे अनुदान, शिक्षणक्षेत्राचे होत असलेले कंत्राटीकरण, आदी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणूक लढविणार आहे. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य शिक्षक हक्क संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य महादेव नरके, राज्य पॉलिटेक्निक संघटनेचे राज्याध्यक्ष श्रीकांत नाईक, वसंत पाटील, ‘एमसीव्हीसी’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देसाई, आयटीआय निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र इंगळे, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे संचालक तात्यासाहेब महाडिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रिंगणात प्रतापसिंह देसाई
By admin | Published: May 29, 2014 1:18 AM