कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलात काम केलेले पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, अमृत देशमुख, मा. शा. पाटील, डॅनियल जॉन बेन यांच्यासह राज्यातील ९६ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली. गुरुवारी गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले. पुणे, मुंबई, लातूर या ठिकाणी बढतीनंतर बदल्या झाल्या. कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात उपअधीक्षक म्हणून मा. शा. पाटील यांची बढती होऊन नियुक्ती झाली आहे.यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले अधिकारी अमृत देशमुख यांची पुणे ग्रामीण मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून बढती झाली. दिनकर मोहिते यांची मुंबईला, कोल्हापूरच्या नागरी हक्क संरक्षण समितीचे निरीक्षक डॅनियल जॉन बेन यांची लातूरला उपअधीक्षकपदी बढतीने बदली झाली.
शाहूपुरी, शाहूवाडीसह जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सोलापूर रेल्वे उपविभागात उपअधीक्षक म्हणून बढती झाली. निरीक्षक संजय कुरुंदकर यांची पुण्यातून मुंबईला सहायक आयुक्तपदी बढती झाली.
सयाजी गवारे यांची पुण्यातच गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे उपाअधीक्षकपदी बढती झाली. त्याशिवाय लक्ष्मीपुरीत सेवा बजावलेले अरुण वायकर यांची पुण्यातून साकोली (भंडारा) येथे उपाअधीक्षकपदावर बढतीने बदली झाली आहे, अशा ९६ जणांना बढती मिळाली आहे.