कोल्हापूर: प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये विनामूल्य प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरता शनिवारी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत सर्व्हर डाऊनमुळे गोंधळ उडाला. त्यामुळे अकरा वाजता सुरू झालेली परीक्षा दुपारी चार वाजता संपली. ऑन कॅमेरा परीक्षा असतानाही सर्व्हरच बंद पडल्याने शेवटी ऑफ कॅमेरा परीक्षा घेतली गेल्याने मास कॉपीची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा करता पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या सहा केंद्रातील प्रवेशासाठी विनामूल्य प्रशिक्षणाकरता शनिवारी सकाळी ११ ते १ यावेळेत सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑन कॅमेरा ऑनलाइन पध्दतीने या परीक्षा होणार असल्याने त्याप्रमाणे तयारी झाली होती.
पण कोल्हापुरात परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या अर्ध्या तासातच सर्व्हर बंद पडल्याने परीक्षा थांबली. अर्धा तासाहून अधिक काळ सुरू होत नसल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. केंद्राच्या वतीने तक्रार निवारणासाठी हेल्पलाइनही दिली गेली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अर्ध्या तासानंतर सर्व्हर सुरू झाला, पण लगेच १० मिनिटांनी बंद पडला. पुढे असेच चालू बंद होत राहिल्याने अखेर ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. तथापि ऑफलाइन परीक्षा झाल्याने आता निकालाबाबतच शंका व्यक्त होत आहे. कॅमेरा नसल्याने परीक्षार्थीनी मिळेल त्या जागेवरून परीक्षा दिली.