कोल्हापूर : ढगांच्या गडगडासह आलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही.
धुवांधार पावसामुळे भरदुपारी सर्वत्र अंधार दाटल्याने वाहनाधारकांवर हेडलाईट लावून वाहने चालवण्याची वेळ आली. मोठ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंती पडून तीन मजूर मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटनाही घडली.गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होत होते, पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारीदेखील सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी दोननंतर वातावरण बदलू लागले. काळ्याभोर ढगांची आकाशात गर्दी वाढली आणि बघता बघता पावनेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक असणाऱ्या पावसाने नंतर वेग पकडला आणि धुवांधार बरसण्यास सुरुवात केली.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की क्षणात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. पावसाच्या माऱ्यामुळे भर दुपारी अंधार पसरला. वाहनधारकांना हेडलाइट चालवून वाहने हाकावी लागली. चारनंतर पावसाचा जोर कमी झाला पण विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट कायम होता. संध्याकाळपर्यंत तुरळक पाऊस सुरूच होता.जोरदार आलेल्या या पावसामुळे ओढे, नाल्यांना ओहळ आले. शहरातील जयंती नालाही ओव्हरफ्लो होऊन धबधब्यासारखा कोसळू लागला. शहरात अनेक घरात पाणी शिरल्याने पाऊस थांबल्यानंतर पाणी उपसण्याचे काम सुरु झाले. अजूनही बऱ्याच घरात पावसाळ्यापुर्वीची घरांची डागडुजी व शेकारणीची कामे लॉकडाऊनमुळे पूर्ण झालेली नाहीत. पावसाचा अंदाज आल्याने अनेक जण निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री टाकण्याची घाईगडबड करताना दिसत होते. तरीदेखील पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे गळती लागलीच. पाऊस थांबल्यानंतर साचलेले पाणी बाहेर काढण्याची कसरत करावी लागली.