कोल्हापूर: कोल्हापूरमधील सम्राटनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रिती प्रशांत जैन या २२ वर्षीय तरुणीनं राहत्या घरी हुकाला ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रिती ही उच्च शिक्षित होती. दुबई येथे चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली होती. मंगळवारी प्रिती मुंबईहून दुबईला विमानानं नोकरीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी जाणार होती. पण त्यापूर्वीच तिनं आत्महत्या करुन जीवन संपवलं. प्रितच्या या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रिती जैन हिच्या वडिलांचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिच्या आईनं प्रितीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड केली होती. तिनं हॉटेल मॅनेजमेंट आणि त्यानंतर एम.बी.ए.ची पदवी घेतली होती. तिला दुबई येथे नोकरीची ऑफर आली होती. ४ सप्टेंबरला तिला नोकरीच्या ठिकाणी हजर रहायचं होतं पण तिची फ्लाईट थोडक्यात चुकली. त्यानंतर मंगळवारी सात सप्टेंबर रोजी म्हणजे, आज तिची दुबईची फ्लाईट बुक झाली.
फ्लाईट पकडण्यासाठी प्रिती काल, म्हणजेच, ६ सप्टेंबरला मुंबईला रवाना होणार होती. त्यासाठी तिला लागणारं साहित्य भरण्यासाठी घरी गडबड सुरु होती. बॅगेत तिचं साहित्य भरण्यासाठी तिला भाऊ आणि आईनं मदत केली. त्यानंतर दुपारी तिघांनी एकत्र जेवण केलं. दुबईत नोकरी मिळाल्यानं तिच्यावर नातेवाईक आणि मित्र मैत्रिणीकडून शुभेच्छांचा वर्षावही सुरु होता.
दुपारी जेवण झाल्यानंतर प्रिती झोपण्यासाठी घरातील वरच्या मजल्यावर गेली. त्यानंतर तिला उठवण्यासाठी घरचे गेले असता तिच्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिच्या भावाने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला असता प्रितीनं फॅनच्या हुकाला ओढणीनं गळफास लावल्याचं दिसून आलं. तिला खाली उतरुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केलं.
प्रितीनं चिट्टीत काय लिहिलं?
मृत्यूपूर्वी प्रिती जैननं लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. चिठ्ठीत वडिलांच्या पश्चात शिक्षणासाठी आईला खूप त्रास झाल्याचा उल्लेख केला आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये. कोणालाही त्रास देऊ नका असा उल्लेख आहे. तिनं नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असं राजारामपुरी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.