कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या संबंधित सर्व यंत्रणांनी सर्व उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच इचलकरंजी येथील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत आवश्यक उपाययोजना मार्चअखेर पूर्ण करा, अशी सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी येथे दिली.पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अन्ब्लगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.इचलकरंजी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी सध्या १५० एकर जागा उपलब्ध असून आणखी १०० एकर जागेसाठी द्विपक्षीय करार केला आहे तसेच अतिरिक्त ३५० एकर जमीन संपादनाचे काम झाले असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने करून हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले तसेच नगरपालिका हद्दीतील पाईपलाईनचे काम ३९ कि.मी. पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने करण्याची सूचनाही त्यांनी केली.कोल्हापूर महानगरपालिकेचा ७६ दशलक्ष लिटर सांडपाणी प्रकल्प स्वयंचलित पद्धतीने चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबरोबरच क्लोरिनेशन प्रक्रिया व गाळ काढण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच सांडपाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करून हे पाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांना देण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.पंचगंगा नदीखोऱ्यातील साखर कारखान्यांनी कंटिन्युअस मॉनिटरी सिस्टीम बसविली असून, सर्व कारखान्यांनी फ्लोमीटर बसविले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. त्रुटी आढळणाऱ्या साखर कारखान्यांना समज देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील दवाखान्यांमधील मेडिकल वेस्ट विल्हेवाट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेमध्ये सर्व डॉक्टर्सना सहभागी करून घेण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्याचीही सूचना त्यांनी केली.पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना करावयाच्या कामांचा समयबद्ध कृती आराखडा तयार करून त्यानुसार नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई, महापालिकेचे जलअभियंता मनिष पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे, ‘निरी’चे प्रतिनिधी प्रणय पवार, तसेच एमआयडीसी, इचलकरंजी व कागल नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.शिवांगींविरोधात आयुक्तांकडे तक्रार चार दिवसांपूर्वी पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड हे प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी यांच्या कार्यालयात त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी गेले होते. माहिती मागितल्यावर शिवांगी यांनी गायकवाड यांना मी शिवसैनिक असून माझ्याकडे पाचशे माणसे आहेत. तुम्हाला दाखवून देऊ, अशी धमकी दिली. याबाबत उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे तक्रार केली. त्यावर पुढील आठवड्यात तुम्ही मुंबईला या. त्यावेळी संबंधितांना बोलावून घेऊन पुढील कार्यवाही करू, अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी दिली. दरम्यान, क्षमतेपेक्षा जादा ऊस गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधितांना यावेळी त्यांनी दिल्या.
पंचगंगा प्रदूषण रोखण्यास प्राधान्य द्या
By admin | Published: January 07, 2016 1:10 AM