कोल्हापूर : कौटुंबिक वादातून तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा आवळून व तोंडावर ठोसे मारून पतीने खून केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. सारिका विठ्ठल महानूर (वय २१) असे मृताचे नाव आहे.
वडणगे-निगवे मार्गावरील रूपाली हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. खून करून संशयित पती विठ्ठल बलभीम महानूर (२५, रा. डाळिंबा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हा पसार झाला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांचे पथक संशयिताचा शोध घेत आहे.
संशयित हा पत्नी सारिकाची आत्महत्या भासवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु त्याला ते शक्य झाले नाही. त्याने खून कोणत्या कौटुंबिक कारणातून केला, हे तो सापडल्यानंतर उलगडा होणार आहे.पोलिसांनी सांगितले, राजोपाध्येनगर येथे राहणारे विजय रामचंद्र सुभेदार (५५) यांची मुलगी सारिका ऊर्फ गुड्डी हिचा विवाह गतवर्षी १२ जूनला नातेवाईक विठ्ठल महानूर याच्याशी झाला. सुभेदार हे वारकरी संप्रदायातील असल्याने सर्व माहिती घेऊनच हे लग्न केले होते. संशयित विठ्ठल हा हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो. लग्नानंतर सारिका व विठ्ठल पाच ते सहा महिने चांगले राहिले.
पतीला दारुचे व्यसन असल्याचे समजल्यावर दोघांमध्ये खटके उडू लागले. या दोघांच्या लग्नासाठी वडणगे-निगवे मार्गावरील हॉटेल रूपालीचे मालक राजू महानूर यांनी मध्यस्थी केली. दोघांना बोलवून हॉटेलमध्ये नोकरी दिली. दोघेही हॉटेलच्या दुसºया मजल्यावर राहत होते. विठ्ठल हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करीत होता.तिच्या खुनाची माहिती समजताच करवीर विभागाचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर ‘सीपीआर’च्या शवागृहात मृतदेह आणला. या ठिकाणी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.अशी घडली घटनासारिकाने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी विठ्ठलने छताच्या हुकाला ओढणी बांधून मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत अडकविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला ते शक्य झाले नाही, त्यामुळे मृतदेह बेडवर टाकून तो पळून गेला. सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमालक राजू महानूर हे दुसºया मजल्यावर गेल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी सारिकाच्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर करवीर पोलिसांना वर्दी दिली.बघ्यांची गर्दीवडणगे-निगवे हॉटेलमध्ये महिलेचा खून झाल्याचे वृत्त परिसरात पसरताच इंदिरानगर, वडणगे, निगवे, गोसावी वसाहत परिसरातील लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. महिलांची संख्या अधिक होती; त्यामुळे हॉटेलचे गेट बंद करून पोलिसांना पंचनामा करावा लागला. गर्भवती विवाहितेचा अशा प्रकारे खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.