अणुस्कुरा : बर्की (ता. शाहूवाडी) येथील गरोदर महिलेला अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तत्काळ उपचाराची गरज होती; परंतु बर्की पुलावर पाणी असल्यामुळे त्यांना गावाबाहेर नेता येत नव्हते, त्यामुळे मांजरे आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर महिलेला मांजरे आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केले, त्यामुळे पुढील धोका टळला.बर्की येथील सुषमा यशवंत पातले या महिलेच्या प्रसुतीची तारीख २२ जुलै ही आहे. परंतु मंगळवारीच त्यांना त्रास होऊ लागल्याचे अशा स्वयंसेविका वंदना खामकर यांनी मांजरे आरोग्य केंद्रात दूरध्वनीवरून कळवले, प्रसंग ओळखून मांजरे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन पवार हे रुग्णवाहिका घेऊन बर्कीकडे निघाले. परंतु बर्की बंधाऱ्यावर पाणी असल्यामुळे त्यांना बर्कीत पोहोचता येत नव्हते, गरोदर महिलेची स्थिती व पूर परिस्थिती याचे गांभीर्य ओळखून डॉक्टर पवार यांनी अशा स्वयंसेविका वंदना खामकर यांना पर्यायी मार्ग असलेल्या वाकीच्या धनगरवाड्याकडे दोन किलोमीटर सावकाशपणे येण्यास सांगितले. वादळवाऱ्यासह कोसळणारा पाऊस चिखलाचा रस्ता यातून मार्ग काढत त्यांनी रुग्णवाहिका बर्कीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाने, कच्च्या रस्त्याने, दोन किलोमीटर जंगलातून पायवाटेपर्यंत पोहोचवली. त्या ठिकाणाहून त्या महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन मांजरे येथे आरोग्य केंद्रात दाखल केले व उपचार सुरू केले, त्यामुळे आत्ता त्यांची तब्येत स्थिर आहे.
मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेला तत्काळ उपचार मिळाले व पुढचा धोका टळला. आरोग्य केंद्राच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी आरोग्यसेविका वंदना डोंबे, डॉ. प्रदीप मोहिते, बी. एस. धनावडे रुग्णवाहिका चालक पाडावे यांचे सहकार्य लाभले.