कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे निवडणूक आयुक्तांसह उद्या, बुधवारी मुंबईत येत आहेत. त्यांना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा अहवाल देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाची लगबग सुरू आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिमेद्वारे करण्यात आलेली मतदार नोंदणी, मतदान केंद्रांची सद्यस्थिती, मतदान व मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार जनजागृती कार्यक्रम, मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटची मतदान केंद्रावरील प्रात्यक्षिके, मतदानासाठी लागणारे साहित्य वाटपाचे ठिकाण, मतदान यंत्रे, मतपेट्या ठेवायची जागा निश्चिती करावी, याबाबतची माहिती असणारा अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागातर्फे सुरू आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संकलित केलेल्या माहितीचा अहवाल घेऊन जिल्हाधिकारी देसाई उद्या मुंबईला जाणार आहेत. या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत होणाºया बैठकीवेळी ही माहिती सादर केली जाणार आहे, असे सूत्राकडून सांगण्यात आले.