भारत चव्हाण / कोल्हापूर, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार असलो तरी ‘भाजप’ने राज्यातील २८८ जागांवर लढण्याची तयारी केली असल्याचे सांगत रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय क्षेत्राला संभ्रमात टाकले. सर्वच्या सर्व २८८ मतदार संघात भाजपने निरीक्षकही नेमल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी कोल्हापुरात पार पडला, त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री पाटील यांनी हे वक्तव्य केले. विधानसभेच्या किती जागा भाजप लढविणार आहे असा प्रश्न विचारला असता मंत्री पाटील यांनी भाजपच्या वाट्याला किती जागा येणार, किती ठिकाणी लढणार हे ठरविण्याचा तसेच सांगण्याचा अधिकार मला नाही. परंतू मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चर्चा करतील, असे सांगितले. कोणत्या पक्षाला किती जागा येतील हे ठरविण्याची प्रक्रिया येत्या आठ पंधरा दिवसात पूर्ण केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपने नेमकी कशी तयारी केली आहे असे विचारले असता मंत्री पाटील यांनी सांगितले की, आम्ही २८८ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी निरीक्षकही नेमले आहेत. परंतू आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जागा भाजपच्या वाट्याला येणार नाहीत त्याठिकाणी भाजपची तयारी सहयोगी पक्षांच्या उमेदवारांसाठी वापरली जाईल. कारण सहयोगी पक्षाचे उमेदवार जिंकले तरच सत्ता येणार आहे.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना योजनावर योजना जाहीर केल्या जात असल्याने टीका होत असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले की, काही खडखडाट नाही. तिजोरीत निधी येत आहे. स्टँम्प ड्युटीच्या माध्यमातून ४१ हजार कोटी येत आहेत. जीएसटीच्या रुपयाने कर मोठा मिळत आहे. त्यामुळे सगळ्या योजना अंमलात आणल्या जातील.