संतोष मिठारी ।कोल्हापूर : अनेकदा विद्यार्थी वर्षभर नियमितपणे अभ्यासक्रम पूर्ण करतात. परीक्षेची तयारी करतात. मात्र, ऐन परीक्षेत अथवा त्याच्यापूर्वी काही विद्यार्थी दुर्दैवाने आजारी पडतात अथवा अपघातात जखमी होतात. काही कौटुंबिक अडचणींमुळे ते परीक्षा देऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी विद्यापीठाने ‘आॅन डिमांड एक्झाम’ (परीक्षा) घेण्याचा विचार सुरू केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही परीक्षा घेण्यासाठी तयारीदेखील केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) उच्चशिक्षण संस्थांमधील परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्यासाठी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. एम. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीने केलेल्या सूचनेमध्ये आॅनलाईन, दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांची तयारी आणि मागणीनुसार (आॅन डिमांड) घेण्याची शिफारस केली आहे. त्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने ‘आॅन डिमांड’ परीक्षा घेण्याचे गेल्या पाच महिन्यांपूर्वी पाऊल टाकले आहे. त्याअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर नॅनो सायन्स, एम. एस्सी.अभ्यासक्रमांसाठी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये दोन पद्धतीने ही परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यातील पहिली पद्धती म्हणजे ८० गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील पेपर आणि दुसरी पद्धत ही विश्लेषणात्मक प्रश्नांचा पेपर आहे. त्यात ४० गुणांचे पेपर हे लेखी आणि उर्वरीत ४० गुणांचा पेपर हा आॅनलाईन पद्धतीने सोडविण्याचा होता.
ऐन परीक्षेच्या कालावधीत काही अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने ‘आॅन डिमांड परीक्षा’ घेण्याचा विचार आहे.- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ