कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची कोल्हापूर विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १,३९५१८ विद्यार्थ्यांच्या गुणांची शाळांनी राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी कोल्हापुरातील विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आज, बुधवार ते शुक्रवारपर्यंत शिबिर होणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या कोल्हापूर विभागातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद शिक्षण मंडळाने दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये शाळांनी केली आहे. त्याच्या स्थळप्रती गेल्या आठवड्यात शाळांनी शिक्षण मंडळात जमा केल्या आहेत. संगणक प्रणालीमध्ये गुणांची नोंद करताना काही तांत्रिक त्रुटी, चुका झाल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, कमी अथवा जादा गुणांची नोंद, एका विषयाचे गुण दुसऱ्या विषयासाठी नोंदविले जाणे, आदींचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी सातारा जिल्ह्याकरिता बुधवारी, सांगली जिल्ह्यासाठी गुरुवारी आणि कोल्हापूर जिल्ह्याकरिता शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत शिबिर आयोजित केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाला सादर केली जाणार असल्याचे विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी मंगळवारी सांगितले.
चौकट
बारावीच्या निकालाबाबत आज प्रशिक्षण
इयत्ता बारावीच्या निकालाचे सूत्र गेल्या चार दिवसांपूर्वी राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्याबाबत शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापकांना राज्य शिक्षण मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवरून सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे देवीदास कुलाळ यांनी सांगितले.