कोल्हापूर : गेले दहा महिने न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नियोजन विभागाच्या ताराराणी सभागृहाचेही नूतनीकरण सुरू आहे. तसेच विविध खात्यांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जानेवारी २०२० मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्तांतरानंतरची पहिली नियोजन समितीची सभा घेण्यात आली. त्यानंतरच्या सभेआधीच कोरोनाचे वातावरण सुरू झाले. याच काळात लॉकडाऊनमुळे गेल्या दहा महिन्यांत जिल्हा नियोजन समितीची सभा झाली नव्हती.
मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असून, जीवन पूर्वपदावर येत आहे. नियोजन समितीची सभा न झाल्याने अनेक विकासकामांवरही त्याचा परिणाम झाला असून, निधी वाटपही थांबले आहे. जिल्ह्याचा विकास आराखडा राज्याकडे पाठविल्यानंतर तेथे पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याने या महिन्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ताराराणी सभागृहाचे नूतनीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी बाकीची कामे झाली असून खुर्च्यांची दुरुस्तीची कामे बाकी राहिली आहेत. या सभेसाठी शासनाच्या सर्व खात्यांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना नियोजन विभागाने पाठविल्या आहेत.
चौकट
जिल्हा परिषदेत बैठक
जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याच्या प्रस्तावांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी सायंकाळी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अंगणवाड्या बांधकाम, शाळा दुरुस्ती, सौर पंप, रस्ते याविषयीच्या आवश्यक निधीचे प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सुचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या. यावेळी वडणगे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव देण्याचेही निश्चित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. विविध विभागांच्यावतीने नावीन्यपूर्ण योजनांचेही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
०२१२२०२० कोल कलेक्टर ०१
जिल्हा नियोजन समितीच्या ताराराणी सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
छाया - समीर देशपांडे