पन्हाळा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र पौर्णिमेची यात्रा सोहळा एप्रिल महिन्यात संपन्न होत आहे. या निमित्ताने यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पन्हाळा येथील नगर परिषद सभागृहात तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली यात्रा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली.
जोतिबाची चैत्र यात्रा होणार की नाही याचे शासकीय आदेश अद्याप आले नसले तरी यात्रा होणार या दृष्टिकोनातून यात्रेची तयारी सुरु केल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगीतले. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात,आंध्र प्रदेश आदी राज्यातून पाच ते सात लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येतात. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी, यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आतापासून जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू केली आहे.भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत तहसीलदार शेंडगे यांनी दिल्या. ज्या विभागातील कर्मचारी यात्रा नियोजनामध्ये कमी पडतील, दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही तहसीलदार शेंडगे यांनी दिला. यात्रेच्या वेळी डोंगरावर येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमण पार्किंग, आरोग्यसेवा, स्वच्छता,लाईट, पाणी सुविधा, सुरक्षितता, दर्शन रांगा, सासनकाठ्यांची उंची, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी कामाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक दीपक मेहेत्तर, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड, गटविकास अधिकारी तुळशीराम शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनील कवठेकर यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.