कोल्हापूर : न्यायालयाचा आदेश असतानाही चौकशीला दप्तर न देणारे भोगावती साखर कारखान्याचे प्रशासन व प्रादेशिक साखर सहसंचालकांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया विरोधी गटाने सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत यासंबंधीची याचिका दाखल केली जाणार असल्याचे विरोधी गटाकडून सांगण्यात आले. ‘भोगावती’ कारखान्याच्या कारभारासह वाढीव सभासदांची चौकशी करावी, अशी मागणी कारखान्याच्या विरोधी गटाने केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले होते, पण सहसंचालकांनी चौकशीला सुरुवातच केली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना घेरावो घातला होता. त्यानंतर मंगळवारी विशेष लेखापरीक्षक तेलंग तपासणीसाठी ‘भोगावती’ साखर कारखान्यावर गेले होते, पण कारखाना प्रशासनाने दप्तर देण्यास विरोध केल्याने तेलंग व कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली होती. त्यामुळे विरोधी गट आक्रमक झाला असून त्यांनी सत्तारुढ गटाने न्यायालयात दाखल केलेली याचिका, त्याचबरोबर न्यायालयाने याबाबत कोणता आदेश दिला याची माहिती घेण्यास आपल्या वकिलांना सांगितले आहे. न्यायालयाचा आदेश असताना सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांनी चौकशी केली नसल्याने त्यांच्यासह चौकशीला दप्तर न देणाऱ्या कारखाना प्रशासनाविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी विरोधी गटाने सुरू केली आहे. दोन दिवसांत याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून याचिका दाखल करणार असल्याची माहिती विरोधी गटाचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे यांनी दिली.
अवमान याचिकेची विरोधकांची तयारी
By admin | Published: January 07, 2015 11:44 PM