कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असताना नगरसेवकांच्या अरेरावीला कंटाळून रजेवर गेलेले सहायक आयुक्त तथा नगरसचिव उमेश रणदिवे हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी त्यांनी दोन महिन्यांच्या रजेचा अर्ज आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठविला आहे. महानगरपालिका सभागृहात काठावरील बहुमत व त्यातून सुरू असलेला राजकीय संघर्ष, इर्ष्येमुळे बेकायदेशीर कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ‘स्वीकृत नगरसेवक’ नियुक्तीवरून गेल्या सहा महिन्यांत सत्तासंघर्ष टोकाचा बनला आहे. यामुळे होत असलेल्या नगरसेवकांच्या अरेरावीपणाला अनेक अधिकारी वैतागले आहेत. त्यातून त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. या सत्तासंघर्षाला कंटाळलेले सहायक आयुक्त तथा नगरसचिव उमेश रणदिवे यांनी बुधवारी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय अचानक घेतला. नगरसेवकांचे जातीचे दाखले रद्द झाल्यामुळे स्थायी, परिवहन तसेच महिला बालकल्याण समितीवरील रिक्त जागांची निवडणूक असो की महापौर, महिला बालकल्याण समिती सभापती निवडणूक असो या सगळ्या प्रकरणांत महानगरपालिकेतील नगरसचिव कार्यालय टीकेचे धनी ठरले आहे; पण उमेश रणदिवे यांनी कायदेशीर बाजू पाहूनच मत नोंदविले आहे. परंतु, काही नगरसेवकांनी त्यांना लक्ष करून काही बेकायदेशीर कामे करून देण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे ते बुधवारी अचानक रजेवर गेले, त्यांनी आपला मोबाईलही ‘स्वीच आॅफ’ केला आहे. दरम्यान, रणदिवे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा संपूर्ण महापालिकेत झाली असतानाच त्यांनी आपण या सत्तासंघर्षाला वैतागून स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले, त्याबाबतचा विचारही त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना बुधवारी रजेवर जाण्यापूर्वी बोलून दाखविला होता. त्यानंतर सोमवारी त्यांनी दोन महिने रजेवर जाण्याचा अर्ज महापालिकेत आयुक्तांकडे पाठविला आहे. सध्या नगरसचिव पदाचा तात्पुरता कार्यभार करनिर्धारक अधिकारी दिवाकर कारंडे यांच्याकडे दिलेला आहे.
नगरसचिव रणदिवे यांची स्वेच्छानिवृत्तीची तयारी
By admin | Published: May 31, 2016 1:25 AM