कोल्हापूर - कोल्हापुरात सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासूनच निर्विघ्नपणे सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी २.३० वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली.
महापालिकेतर्फे पापाची तिकटी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. सर्व मंडळांना नारळ, सुपारी, पानाचा विडा आणि रोप भेट देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. दरम्यान, दुपारपर्यंत मोठ्या ११० आणि छोट्या ८० गणेश मूर्तीचे इराणी खणीत विसर्जन झाले .
पर्यावरण पूरक मिरवणूक
अनेक गणेश मंडळानी ढोल, ताशे, हलगी, लेझीम, धनगरी ढोल, बँजो अशी पारंपारिक वाद्ये मिरवणुकीत आणली होती. बजापराव माने तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका वेशात मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मंडळाने पर्यावरण पूरक देखावा सादर केला. सकाळपासून खासदार धैर्यशील माने, आमदार जयश्री जाधव, आदील फरास, मधुरीमा राजे छत्रपती यांनी विविध मंडळांचे स्वागत केले.