कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर आकाश स्वच्छ होऊन ऊन पडले.शुक्रवार (दि. १८) पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. शनिवारी सकाळी आकाश दाटून आले होते. हवेत गारवा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.
तब्बल पाऊण तास एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. त्यानंतर मात्र पाऊस थांबला आणि ऊन पडले.दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २.२७ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात ९.५०, तर शिरोळमध्ये सहा व हातकणंगले तालुक्यात ६.६३ मिलिमीटर पाऊस झाला.