कोल्हापूर : मशीनने तोडलेल्या उसातून पाला-पाचोळ्यापोटी ५ टक्के वजन कपात केली जाते. याबाबत अभ्यास करून वस्तुस्थिती अहवाल सादर करावा, अशी मागणी जयशिवराय शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी अभ्यास गटाचे सदस्य डॉ. सुभाष घोडके यांच्याकडे केली.साखर कारखाने मशीनने तोडलेल्या उसाच्या वजनातून ५ टक्के वजन कपात करतात, मात्र ते १ टक्का करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. याबाबत साखर आयुक्तांनी अभ्यास गटाची नेमणूक केली असून त्यांनी शेतकरी व साखर कारखान्यांशी चर्चा करून अहवाल सादर करायचा आहे.
या अभ्यास गटात पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ. सुभाष घोडके यांचा समावेश आहे. त्यांना याबाबत वस्तुस्थिती सांगण्यासाठी जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, ह्यबळीराजाह्ण संघटनेचे काका पाटील यांनी डॉ. घोडके यांची भेट घेतली.साखर कारखाने मशीनतोड उसास ५ ते ६ टक्के कपात लावत आहेत. यावर्षी कोरोना आपत्तीचे कारण पुढे करून अनेक साखर कारखान्यांनी मशीनने ऊसतोडीचे मोठ्या प्रमाणात नियोजन केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कायद्यानुसार १ टक्काच वजावट करावी लागते, मात्र कारखानदारांनी मनमानी पध्दतीने वसुली सुरू केली आहे. याबाबत आपण वस्तुस्थिती जाणून घेऊन अहवाल द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी डॉ. घोडके यांच्याकडे केली.