कोल्हापूर : झेप प्रगती आणि श्रीमंतीकडे अशी टॅगलाईन असलेले आणि पुढील वर्षात भरीव विकासकामांचे आश्वासन देणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१९-२० चे सुधारित तसेच सन २०२०-२१ सालचे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. विशेष म्हणजे या अंदाजपत्रकाला कोणतेही फाटे न फोडता एकमताने मंजूर केल्यानंतर महापौर आजरेकर यांनी त्यावर सही करून ते प्रशासनाकडे सुपूर्त केले. आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी सुरू करा,असे आदेशच महापौरांनी यावेळी दिले.कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आणि लॉकडाऊन लागू झाल्यामुळे गेले तीन महिने लांबलेले अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे यांनी शुक्रवारी महासभेपुढे सादर केले. अंदाजपत्रकात विकासकामांवर भर देतानाच ग्रीन एनर्जी, ऑक्सिजन पार्क, क्लीन डर्टी स्पॉट, एअर फिल्टर प्रकल्प, बचत गटांसाठी मॉल असे काही नवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प व सेफ सिटी टप्पा २ ही कामे मागील पानावरून पुढे घेण्यात आली आहेत. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वच नगरसेवकांना खुश करण्यात आल्याचेही यातून दिसते.प्रशासनाने सुचविलेल्या महसुली उत्पन्नात स्थायी समितीने तब्बल ४५ कोटी ५० लाखांची वाढ सुचवून तेवढाच निधी अन्य विकासकामांवर खर्च करण्याचे ठरविले आहे; परंतु हा खर्च अपेक्षित जमेवरच अवलंबून राहील.नवीन वर्षातील अपेक्षित जमा व खर्च
- अव्वल शिलकेसह महसुली व भांडवली जमा - ६१३ कोटी १७ लाख
- एकूण भांडवली खर्च - ६१० कोटी ९७ लाख
- विशेष प्रकल्पांतर्गत जमा - ४११ कोटी ८८ लाख; तर खर्च - ३९७ कोटी
- वित्त आयोगांतर्गत जमा - ६३ कोटी ७१ लाख, तर खर्च - ४८ कोटी ७७ लाख
- सर्व मिळून एकूण बजेट - १०८८ कोटी ७७ लाखांचे