इचलकरंजी : यंत्रमाग कारखानदारांनी कापड उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या समूह यार्न बॅँक या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग सहायक संचालक सिद्धेश्वर डोंबे यांनी रविवारी येथे केले. तसेच यंत्रमाग उद्योगातील आर्थिक मंदीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योगामध्ये सध्या अभूतपूर्व मंदी आली असून, त्याचा मोठा फटका यंत्रमाग कारखानदारांना बसत आहे. यामुळे यंत्रमाग उद्योग कोलमडून पडण्याची भीती आहे. तरी केंद्र सरकारने या परिस्थितीतून यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था देणारी उपाययोजना करावी, असे निवेदन येथील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सुरेश गंगवार यांना पाठविले होते. या निवेदनास अनुसरून सहायक संचालक डोंबे व तांत्रिक अधिकारी अशोक मामड्याल यांनी रविवारी इचलकरंजीस भेट दिली. पॉवरलूम असोसिएशनच्या कार्यालयात या दोघांनी विविध यंत्रमागधारकांशी चर्चा केली. त्यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, टेक्स प्रोसिलचे विश्वनाथ अग्रवाल, तसेच पॉवरलूम असोसिएशनचे संचालक व कारखानदार उपस्थित होते. यंत्रमागावर कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलासाठी वित्तीय संस्थांच्या व्याजदरामध्ये सरकारने सवलत द्यावी, सुताचे भाव स्थिर ठेवावेत, विजेच्या दरामध्ये सवलत मिळावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी झालेल्या चर्चेत यंत्रमाग कारखानदारांच्या प्रतिनिधींनी केल्या. (प्रतिनिधी)
‘यंत्रमाग’ मंदीचा अहवाल सरकारला सादर करणार
By admin | Published: July 18, 2016 1:00 AM