कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला आता आॅक्टोबरमध्ये नवे सरकार सत्तेवर आल्यानंतरच कायमस्वरूपी अध्यक्ष मिळणार आहे. आज, शुक्रवारपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे पद रिक्तच राहिले आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच लागल्याने मुख्यमंत्र्यांना हे पद कुणाला द्यावे, याचा निर्णय घेता आला नाही. त्यामुळे सत्ता असूनही पद रिक्त राहिले.कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्णांतील सुमारे साडेतीन हजारांहून जास्त देवस्थानचा कारभार या समितीतर्फे चालतो. या देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनी आहेत. त्याशिवाय सोने-चांदी यासारखी मालमत्ताही आहे. पदाची मुदत संपल्याने गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त राहिले. शासनाने याचा तात्पुरता पदभार जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे दिला. त्यांना त्यांच्या मूळ कामांतून देवस्थानच्या कामासाठी फारसा वेळ देता आला नाही. काँग्रेसकडून माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, डॉ. संजय डी. पाटील व सुरेश कुराडे यांची नावे स्पर्धेत होती. तिघांनीही आपापल्या पातळीवर जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती. त्यातील एकाला संधी दिल्यावर दुसरा दुखावतो, म्हणून मुख्यमंत्र्यांनी या तिघांशिवाय माजी आमदार पी. एन. पाटील यांना ही जबाबदारी घ्या, असे सुचविले परंतु त्यांनीही आपल्याला या कामासाठी वेळ देता येणार नसल्याचे सांगून त्यास नकार दिला. अध्यक्षाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. नियुक्तीनंतर सरकार बदलले तरी ही नियुक्ती रद्द होत नाही. त्यामुळे काँग्रेसने एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्यास या सत्तेची संधी द्यायला हवी होती,परंतु पद रिक्त ठेवायला नको होते. (प्रतिनिधी)
‘देवस्थान’चे अध्यक्षपद लटकले...!
By admin | Published: September 13, 2014 12:45 AM