कोल्हापूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले. श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, कुंकुमार्चन अभिषेक करुन केली विधिवत पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 02, 2024 4:08 PM