उद्धव गोडसे
कोल्हापूर : वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलिस हवालदार नामदेव यादव यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले. प्रजासत्ताकदिनी शाहू स्टेडियम येथे होणा-या ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंत आणि यादव यांना सन्मानित केले जाणार आहे. राजस्थानमधील कुख्यात बिष्णोई टोळीला जानेवारी २०२० मध्ये किणी टोल नाका येथे जेरबंद केल्याबद्दल सावंत आणि यादव यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले.पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केलेले पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचा-यांना दरवर्षी राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित केले जाते. यंदाची शौर्यपदकप्राप्त पोलिसांची यादी बुधवारी (दि. २५) जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातील ७४ पोलिसांची समावेश असून, कोल्हापुरातील पोलिस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत आणि पोलिस हवालदार नामदेव महिपती यादव यांनाही हा सन्मान जाहीर झाला. सावंत यांनी २८ जानेवारी २०२० मध्ये पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे राजस्थानधील कुख्यात बिण्णोई टोळीला जेरबंद केले होते.राजस्थानसह उत्तर भारतात दीडशेपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बिष्णोई टोळीतील गुन्हेगार २०११ पासून फरार होते. बेंगळुरूकडून मुंबईच्या दिशेने जाणा-या सशस्त्र टोळीच्या किणी टोल नाक्यावर मुसक्या आवळण्याची धाडसी कामगिरी पोलिस निरीक्षक सावंत यांच्या पथकाने केली होती. पोलिस हवालदार नामदेव यादव यांचाही त्याच पथकात समावेश होता. पोलिस दलात मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाल्यामुळे सावंत आणि यादव यांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले.