कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठीच्या अर्जांच्या माघारीची आज, सोमवारी मुदत होती, पण निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्यांपैकी कोणीच माघार घेतली नसल्याने निवडणूक लागल्याचे स्पष्ट झाले. त्यात नाईट कॉलेज आॅफ आर्टस् अँड कॉमर्सच्या श्वेता परुळेकर हिची अध्यक्षपदासाठी शहाजी कॉलेजचा पंकज मोरे आणि सचिवपदासाठी नागठाणे (सातारा) येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या कमलेश साळुंखे यांच्याशी लढत होणार आहे. शनिवारी (दि. २०) अध्यक्ष व सचिवपदासाठीची निवडणूक होईल.छाननीच्या प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी श्वेताचे तीन आणि शहाजी कॉलेजच्या पंकजचे दोन तसेच सचिवपदासाठी कमलेशचा तसेच श्वेताचे तीन अर्ज वैध ठरले. त्यातील श्वेता हिला आजी-माजी विद्यार्थी संघटनेसह काही विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पंकज आणि कमलेश यांना काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’ने पुरस्कृत केल्याचे समजते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडून प्रयत्न झाले. मात्र, अध्यक्षपदावरून एकमत झाले नसल्याने आज माघारीच्या मुदतीत कोणीच माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक लागल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोणीच माघार घेतलेली नाही. शनिवारी (दि. २०) दुपारी तीन वाजता अध्यक्ष, सचिवपदासाठी निवडणूक होईल, असे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)प्रवेशशुल्कासह विविध स्वरूपांतील विद्यापीठ आणि महाविद्यालयांकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आणि त्यांच्या प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे.-पंकज मोरेगुणवत्तेच्या जोरावर आणि लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होणे अपेक्षित आहे, पण काही संघटनांकडून ती प्रतिष्ठेची बनविली जात आहे. प्रतिस्पर्ध्यांनी सध्या अधिकतर मतदारांना सहलीवर पाठविल्यामुळेच मला ते भेटत नाहीत. निवडणुकीतील ही पद्धत चुकीची आहे. महाराणी ताराराणीचा वारसा तसेच मृणाल गोरे, मेधा पाटकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यापीठाच्या या निवडणुकीस सामोरे जात आहे.-श्वेता परुळेकरबदलत्या परिस्थितीत तंत्रज्ञानामुळे सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहील.-कमलेश साळुंखे
अध्यक्ष, सचिवपदाची दुरंगी लढत रंगणार
By admin | Published: September 16, 2014 12:25 AM