लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ गटातील फूट टाळण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ज्येष्ठ संचालकांसोबत चर्चा सुरू असली तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेण्यासाठी त्यांचा दबाव आहे. मात्र, मुश्रीफ यांना महादेवराव महाडीक यांची ॲलर्जी आहे. त्यामुळे एक गठ्ठा मते असलेल्या संचालकांचे बंड थोपवताना सत्तारूढ गटाची दमछाक होणार, हे निश्चित आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकारणाला उकळी येऊ लागली आहे. ‘गोकुळ’चे राजकारण हे ठरावावर अवलंबून असल्याने येथे माजी अध्यक्षांच्या भूमिकेला खूप महत्त्व आहे. मल्टिस्टेटच्या मुद्यावरून काही संचालकांमध्ये अस्वस्थता होती. त्याचवेळी अरुण डोंगळे यांनी थेट नेतृत्वालाच आव्हान दिले. त्यानंतर अध्यक्ष बदल करताना जे राजकारण झाले, त्यातून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील दुखावले आहेत. स्वतंत्र ठराव दाखल करून त्यांनी नाराजी दाखवून दिली. मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ची निवडणूक लढविणार असे डोंगळे यांनी जाहीर केले असले तरी विश्वास पाटील यांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मोट बांधली आहे. त्यात सत्तारूढ गटातील महत्त्वाचे संचालक विरोधकांच्या हाताला लागले तर सत्ता राखणे तितकेसे सोपे नाही, याची जाणीव नेत्यांना झाल्याने फूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच ज्येष्ठ संचालकांची मते नेत्यांनी जाणून घेतली, यामध्ये मंत्री मुश्रीफ हे मागील निवडणुकीत सोबत होते. त्यांना सोबत घ्या, असा आग्रह दोन संचालकांनी धरला आहे. मात्र, मंत्री मुश्रीफ यांना महाडीक यांची ॲलर्जी आहे, त्यातच सतेज पाटील, मंडलिक यांच्या सोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने पेच निर्माण होणार आहे.